web-banner-lshep2024

Breaking News

११ कोटी कागदावर, खड्डे रस्त्यावर!पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करा; अन्यथा नढई फाट्यावर चक्काजाम ग्रामस्थांचा इशारा

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील नढई ते नारीवली या सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि धुळीच्या साम्राज्यामुळे हा मार्ग अपघातांना आमंत्रण देत आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही रस्त्याची कोणतीही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी नढई फाट्यावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नढई, भुवन, भुवनपाडा, दहिगाव, शेलारी, म्हाडस, बांधिवली आणि नारीवली या आठ गावांना जोडणारा हा एकमेव प्रमुख मार्ग आहे. दररोज शेकडो नोकरदार, शाळकरी विद्यार्थी, दूध उत्पादक, शेतकरी, रुग्णवाहिका आणि विविध कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक याच रस्त्यावर अवलंबून आहेत. मात्र सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रस्त्याच्या दुरुस्ती, रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी नढई-नारीवली रस्ता संघर्ष समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. यासंदर्भात प्रसारमाध्यमांमधूनही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विशेष निधीतून या रस्त्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याचे सांगितले जात आहे.

मात्र प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश यांसारख्या टप्प्यांमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास अद्याप विलंब होत आहे. परिणामी नागरिकांना मंजूर निधीपेक्षा रस्त्यावरील खड्ड्यांचाच अधिक अनुभव येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

बांधिवली परिसरात नव्याने सुरू झालेल्या स्टोन क्रेशर उद्योगांकडे जाणाऱ्या अवजड व ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे रस्त्याची स्थिती अधिकच खालावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन धावणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठे खड्डे निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यामुळे या मार्गावरील ओव्हरलोड वाहतुकीवर तात्काळ निर्बंध आणावेत तसेच मुरबाड पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाकडून कोणतीही तातडीची उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. रस्त्याची दुरुस्ती तातडीने न झाल्यास सर्व आठ गावांतील महिला, पुरुष आणि युवक नढई फाट्यावर उतरून चक्काजाम आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

"११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या घोषणा होत आहेत; मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर आजही खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. पावसाळ्यात एखादा गंभीर रुग्ण दवाखान्यात पोहोचवायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

No comments