web-banner-lshep2024

Breaking News

"मुख्यमंत्र्यांचे ‘दोन्ही डोळे’ आमनेसामने; गटबाजीच्या राजकारणात प्रकाश भोईर ठरतील का तिसरा पर्याय?"


नामदेव शेलार | भिवंडी : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने सहकार क्षेत्रासह राज्याच्या राजकारणातही उत्सुकता निर्माण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांना आपले “उजवे आणि डावे डोळे” संबोधले होते. मात्र ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हेच दोन्ही डोळे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचे चित्र दिसत असून, मुख्यमंत्री म्हणून पक्षातील गटबाजी रोखण्यात फडणवीस यांचा ‘तिसरा डोळा’ अद्याप अपयशी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजपामध्ये अनेक निवडणुकांदरम्यान कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यातील मतभेद वेळोवेळी उघडपणे समोर आले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांतील राजकीय स्पर्धा चर्चेचा विषय ठरली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने या अंतर्गत वादाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

ठाणे आणि पालघर हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण झाले असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अद्याप एकत्रित स्वरूपात कार्यरत आहे. या बँकेच्या २१ संचालक पदांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी स्वतः संचालकपदाच्या निवडणुकीत उतरून बिनविरोध निवड मिळवली आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर राजकारण केलेला नेता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय झाल्याने त्यामागे सहकार क्षेत्रावरील वर्चस्व की स्थानिक राजकीय समीकरणांना शह देण्याची रणनीती, याबाबत चर्चा सुरू आहे.

कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘परिवर्तन पॅनल’ उभे राहिले असून महायुतीतील काही घटक त्यांच्यासोबत असल्याचे मानले जाते. दुसरीकडे आमदार किसन कथोरे यांनी ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याचे सांगत स्वतंत्र भूमिका घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले गेले नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी इच्छुक उमेदवारांना एकत्र करून स्वतंत्र सहकार पॅनलला मार्गदर्शन सुरू केले आहे.

या राजकीय संघर्षात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते पडघा-आकोली परिसरातील युवा नेतृत्व प्रकाश शंकर भोईर यांनी. इतर मागासवर्गीय गटातून निवडणूक लढवणारे भोईर हे दोन्ही प्रमुख गटांबाहेरील प्रभावी उमेदवार म्हणून उदयास आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवक आणि लघुउद्योजक यांच्याशी असलेला त्यांचा थेट संपर्क त्यांना इतर उमेदवारांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देत आहे.

ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती सभापती अशा विविध पदांवर काम करताना प्रकाश भोईर यांनी ग्रामीण विकास, शेतकरी प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यावर सातत्याने काम केले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या मतदारांच्या भावनेचा फायदा त्यांना मिळू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

ग्रामीण भागात आजही शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट आणि लघुउद्योगांना आर्थिक बळ देण्याची गरज आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानली जाते. त्यामुळे सत्ता संघर्षापेक्षा विकासाचा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.

राजकीय गटबाजी, महायुतीतील अंतर्गत समीकरणे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, शिवसेना-भाजपमधील स्थानिक संघर्ष आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा निवडणुकांची गणिते या सर्वांचा परिणाम या निवडणुकीवर होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकारी बँकेची न राहता ठाणे-पालघरच्या भावी राजकारणाची दिशा ठरवणारी ठरत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रकाश शंकर भोईर हे “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या ब्रीदवाक्याने काम करीत आहेत. त्यामुळे पक्षीय गटबाजीला कंटाळलेल्या आणि तळागाळातील नेतृत्वाला संधी देण्याची इच्छा असलेल्या मतदारांचा ओढा त्यांच्या दिशेने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.आता या निवडणुकीत मतदार मोठ्या नेत्यांच्या वर्चस्वाला पसंती देतात की तळागाळातून उभ्या राहिलेल्या नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवतात, याकडे संपूर्ण ठाणे-पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

No comments