web-banner-lshep2024

Breaking News

अखेर हा अनोळखी मृतदेह कोणाचा? मुरबाड पोलिसांचे नागरिकांना आवाहन;१० ते १५ दिवसांपासून मृत्यू झाल्याचा अंदाज; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

कुणाल शेलार / मुरबाड:  तालुक्यात आढळून आलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत इसम कोण आहे? तो कुठल्या गावचा आहे? त्याचे नातेवाईक कुठे आहेत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून मुरबाड पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मुरबाड पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू रजिस्टर क्र. ४५/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असून उंची सुमारे ५.५ फूट आहे. इसमाचा रंग काळा, केस लांब व दाढी पांढरी आहे. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट असून त्यावरील लेबलावर "MAJNAB GARMENT MADE IN INDIA" असा उल्लेख आहे. तसेच काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली होती.

घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंमध्ये मनगटी घड्याळ, पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज आणि इतर काही वस्तूंचा समावेश आहे. मृतदेहाची अवस्था पाहता संबंधित इसमाचा मृत्यू सुमारे १० ते १५ दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटावी यासाठी मुरबाड पोलिसांनी छायाचित्रांसह माहिती सार्वजनिक केली असून नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हरविलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी अथवा संबंधित व्यक्तीबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजही अनेक कुटुंबे आपल्या हरविलेल्या नातेवाईकांचा शोध घेत असतात. अशा परिस्थितीत या अनोळखी इसमाची ओळख पटल्यास त्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, सदर अनोळखी व्यक्ती संदर्भात कोणालाही कोणतीही माहिती असल्यास आम्हाला 8657936964/9594955957/9720597221 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात मुरबाड पोलीस ठाणे यांनी केले आहे.

No comments