करोडोंची विकासकामे सुरू; पण माहिती फलकांचा पत्ता नाही!
गौरव शेलार / मुरबाड
: मुरबाड नगरपंचायत
हद्दीतील १७ प्रभागांमध्ये सध्या करोडो रुपयांची विविध विकासकामे सुरू असून काही
कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. रस्ते, गटारे, उद्याने,
व्यायाम साहित्य, सार्वजनिक सुविधा आणि इतर
मूलभूत विकासकामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. मात्र, या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेले माहिती दर्शक फलक अद्यापही अनेक ठिकाणी
लावण्यात आलेले नाहीत, ही बाब आता चर्चेचा
विषय ठरत आहे.
मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी
सुमारे दोन महिन्यांपूर्वी सर्व संबंधित ठेकेदारांना स्पष्ट आदेश देत प्रत्येक
विकासकामाच्या ठिकाणी कामाचे नाव, मंजूर निधी, मंजुरीची
तारीख, काम पूर्ण होण्याची मुदत, काम
करणारी एजन्सी आणि संबंधित तांत्रिक माहिती असलेले फलक तात्काळ लावण्याचे निर्देश
दिले होते. मात्र, आदेश देऊन दोन महिने उलटूनही अनेक
कामांच्या ठिकाणी असे फलक दिसून येत नसल्याने ठेकेदारांकडून आदेशाची जाणीवपूर्वक
अवहेलना केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
कोणते काम किती निधीतून होत आहे, त्याचा
लाभ कोणाला मिळणार आहे, कामाची मुदत काय आहे आणि काम
दर्जेदार होत आहे का याची माहिती नागरिकांना मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
मात्र माहिती फलक नसल्याने अनेक विकासकामांबाबत नागरिक अंधारात राहत असल्याचे चित्र
आहे.
शहरातील काही भागांत लाखो रुपयांची गटारे बांधली जात आहेत, तर
काही ठिकाणी करोडो रुपयांची उद्याने आणि व्यायाम साहित्य उभारले जात आहे. परंतु या
कामांचा खर्च, उद्देश आणि मंजुरी याबाबत कोणतीही माहिती
उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.दरम्यान, मुरबाड नगरपंचायतीचा नवीन विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत असून त्यावर
अनेक हरकती प्राप्त झाल्या आहेत. आराखडा अंतिम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न
सुरू असताना सध्या जुन्या नियोजनानुसार अनेक विकासकामे सुरू आहेत.
नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर काही सुरू असलेली कामे
बदलावी लागण्याची किंवा निष्कासित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे
झाल्यास या कामांवर खर्च झालेला जनतेचा पैसा वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात
आहे. त्यामुळे विकासकामांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देणे आणि त्यांची
उपयुक्तता जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या
संबंधित ठेकेदारांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला
जात आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी माहिती फलक अनिवार्य असताना
त्याकडे होत असलेले दुर्लक्ष संशयाला वाव देणारे असल्याची टीका नागरिकांकडून होत
आहे.
मुरबाड शहरातील सर्व सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी
तातडीने माहिती दर्शक फलक लावण्यात यावेत, कामांचा संपूर्ण तपशील
नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांवर
दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता
नागरिकांकडून होत आहे.
"विकासकामे दिसत आहेत; पण त्यामागचा हिशोब दिसत नाही. करोडो रुपयांचा निधी खर्च होत असताना
नागरिकांना माहितीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. पारदर्शकतेसाठी प्रत्येक कामासमोर
माहिती फलक असणे आवश्यक आहे," अशी भावना नागरिक
व्यक्त करत आहेत.



No comments