web-banner-lshep2024

Breaking News

देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

मुंबई : ‌‌विधानसभेला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर अखेर तब्बल ११ दिवसांनी राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सुटला. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर बुधवारी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज नेते, सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला मुंबईतील आझाद मैदान आता सज्ज झाले आहे.

भाजपचा विधिमंडळ पक्षनेता कोण होणार, याकडे विधानसभेच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक दिवसांपासून विविध नावांची चर्चा झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यातच पडली. बुधवारी सकाळी त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर, ‘कौन बनेगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. त्यानंतर फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. यावेळी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामनही हजर होत्या.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस, शिंदे व पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या महानाट्यावर पडदा टाकला. “आम्ही तिन्ही नेते एकत्रच आहोत. आणखी कोण शपथ घेणार? हे लवकरच कळेल. मी एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

शिंदेचे माहित नाही, पण मीशपथ घेणार- अजितदादा

शिंदे आणि पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारला असता, ‘शिंदे शपथ घेणार की नाही, हे मला माहित नाही, पण मी मात्र नक्कीच घेणार आहे,’ अशी कोपरखळी अजित पवारांनी मारल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर अजितदादांना पहाटे व संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे, असे चोख प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याचा अंक यावेळीही पाहायला मिळाला. शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही, ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.

“मला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय देणार, यासाठी महायुतीने काम केले. याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, त्याच ठिकाणी आम्ही फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देत आहोत. आज खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन करण्याचा आनंद होत आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, महत्त्वाची खाती मिळण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीश्वरांच्या भेटीसाठी गेलेल्या अजित पवार यांनीही खुलासा केला. “आपण दिल्लीला कोणालाही भेटायला गेलो नव्हतो. मी दिल्लीला वेगळ्या कामासाठी गेलो होतो. आमच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा जनतेला करून देण्यासाठी आता महायुती प्रयत्न करणार आहे. जी आश्वासने निवडणुकीच्या काळात दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवले. भाजपला १३२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचे संख्याबळ २३६ इतके झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता ठरवण्याइतकेही संख्याबळ नाही.

जनतेला मविआचा प्रयोग न आवडल्याने महायुतीला मोठे बहुमत - सीतारामन

विधानसभेची ही निवडणूक नेहमीसारखी नसून खास होती. जनतेने हरयाणा आणि आता महाराष्ट्रात जो कौल दिला आहे, तो विकसित भारतासाठी दिला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारमुळे अस्थिरता निर्माण झाली होती. विकासाचा मुद्दा अडकून पडला होता हे लक्षात घेत जनतेने महायुतीला हे बहुमत दिले आहे. राज्यातील अनैसर्गिक आघाडीमुळे महाराष्ट्रात हे काय सुरू आहे, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली होती, यातून जनतेने हा कौल दिला आहे, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या निरीक्षक निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे, शरद पवारांनाही निमंत्रण

राजशिष्टाचार विभागाकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या सर्वांना महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला राज्यातील विरोधी पक्षनेत्यांसोबतच इतर राज्याचे पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष यांनासुद्धा राज शिष्टाचार विभागाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष?

देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झालेले असतानाच, विधानसभेचे अध्यक्ष कोण असणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र विधानसभेचे अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडेच दिले जाईल, अशी चर्चा आहे. महायुतीकडे मोठे संख्याबळ असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद तीन पक्षांपैकी कुणाकडे जाणार, याचीही उत्सुकता होती. मात्र, भाजपने विधानसभा अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवले आहे.

विशेष अधिवेशन ७ ते ९ डिसेंबरला

महाराष्ट्राच्या विधानसभेत नव्या सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल. त्याशिवाय आमदारांचा शपथविधी सोहळा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. त्यासाठी ७, ८ आणि ९ डिसेंबरला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे. ७ आणि ८ डिसेंबर रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होईल तर ९ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.

चोख पोलीस बंदोबस्त

आझाद मैदानात होणाऱ्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच १० पोलीस उपायुक्त, २० सहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, १५० सहाय्यक आणि पोलीस उपनिरीक्षकांसह १५०० हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा

यंत्रणाही सज्ज असणार आहेत. याशिवाय आझाद मैदान परिसर हा ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला असून आजूबाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत. शिवाय ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

No comments