'अमृता'हूनी गोड नाम तुझे 'देवा'! रोहित पाटील यांच्या भाषणाने सभागृहात हास्यस्फोट
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये प्रथमच भाषण करताना शाब्दिक कोट्या करीत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. आपण सर्वात तरुण आमदार असल्याने सर्वात तरुण असलेल्या अध्यक्षांनी आपल्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे रोहित पाटील म्हणाले.
सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला, तसा सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मी पटकावला आहे. माझ्याकडे लक्ष असावे याचे कारण म्हणजे मीही वकिली पूर्ण करीत आहे, एक क्रमांकाच्या आसनावर असलेल्या वकिलास तुम्ही जशी मदत करता, तशीच मलाही कराल, असे म्हणत रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.
ते पुढे म्हणाले, संत तुकारामांच्या वाणीतील एक अभंग आहे. “अमृताहूनी गोड तुझे नाम देवा”, आता संतांच्या वाणीतूनसुद्धा आपले नाव गोड पद्धतीने घेतले गेले आहे. पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड वागणूक द्या, अशी विनंती करतो असे म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला. देवेंद्र फडणवीसांनीही मिश्किल हास्य केले.
No comments