कुर्ला अपघातातील मृतांची संख्या ७ वर; ३३ जण जखमी, दोघांची प्रकृती अद्याप गंभीर
मुंबई : कुर्ला येथे सोमवारी रात्री घडलेल्या बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या ७ वर पोहोचली असून ३३ जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. याप्रकरणी आरोपी बसचालक संजय मोरे याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची, तर बेस्टकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बसचालक मोरे याने मद्यप्राशन केले नव्हते अथवा बसमध्येही तांत्रिक बिघाड नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईची दुसरी ‘लाइफलाईन’ असलेल्या बेस्ट बसच्या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ६० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक ३३२ या भाडेतत्त्वावरील बसच्या चालकाने कुर्ला पश्चिम, आंबेडकर नगर, बुद्ध कॉलनी, महापालिका ‘एल’ वार्ड कार्यालय, एस. जी. बर्वे मार्ग, अंजुमन ए इस्लाम शाळेसमोर एका रिक्षाला आणि आणखीन काही वाहनांना, तसेच पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत समोर असलेल्या रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील प्रवासी, रिक्षाचालक आणि काही पादचारी असे मिळून ३३ जण गंभीर जखमी झाले, तर ७ जणांचा मृत्यू झाला.
या सर्व जखमींना तातडीने तेथील नागरिकांनी नजीकच्या भाभा आणि सायन रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले, तर उर्वरित चार जणांचा उपचारादम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
चालक संजय मोरे याने मद्यपान केले नव्हते
हा अपघात ज्यावेळी झाला, त्यावेळी चालक संजय मोरे याने मद्यपान केले नव्हते, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी दिली. पोलीस तपासामध्येही असे काही नमूद नाही. तसेच संजय मोरे हा नवखा ड्रायव्हर नव्हता. याआधी देखील त्याने ड्रायव्हिंग केले आहे. चार वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्याने काम केले असल्याची माहिती डिग्गीकर यांनी दिली.
चौकशीसाठी दोन समित्या स्थापन
बेस्टच्या वतीने या अपघाताची चौकशी करण्यासाठी तत्काळ दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. एका समितीमध्ये दोन आरटीओ अधिकारी आणि बेस्ट प्रशासनाचा एक अधिकारी आहे. या दोन्ही समित्या बेस्ट प्रशासनाला दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहेत. यामध्ये गाडी सदोष होती की ड्रायव्हरची काही चूक होती याची माहिती एक समिती देणार आहे, तर दुसरी समिती प्रामुख्याने जखमींच्या आणि मृतांच्या नातेवाईकांना ‘क्लेम’चे पैसे लवकर मिळावेत यासाठी काम करणार असल्याचे डिग्गीकर यांनी सांगितले.
पतीला दारूचे व्यसन नाही!
मी आणि पती संजय मोरे हे खूप मेहनत करतो. माझे पती संजय मोरे हे रोज १ वाजता तिथून निघतात. माझे पती दारू पीत नाहीत. कुणालाही त्रास देणार नाहीत. कधी मान वर करूनही कुणाशी बोलले नाही. २३ वर्षांपासून आमचा संसार सुरू आहे. आजवर संजय मोरेंनी कधीही अपघात केलेला नाही. माझा नवरा निर्दोष आहे तो सुटून येईल. जे घडले ते चुकून झाले आहे. माझ्या नवऱ्याचा काहीच दोष नाही. गाडीचा ब्रेक फेल झाला असावा, असे मला वाटते. माझी आणि माझ्या कुटुंबाची मागणी हीच आहे, माझे पती सुखरूप घरी आले पाहिजेत. बाकी आमची काहीच मागणी नाही.
आफरीनचा नोकरीचा पहिलाच दिवस
१९ वर्षीय आफरीनच्या नोकरीचा सोमवारी पहिला दिवस होता. काम संपवून ती घरी परतत होती. घरी येताना रिक्षा मिळाली नसल्याने वडिलांनी तिला कुर्ला स्टेशनपर्यंत चालत येण्यास सांगितले. मात्र, चालत न येता आफरीनने बसचा मार्ग पत्करला. दरम्यान, वडील सलीम यांना काही वेळाने आणखी एक फोन आला, यावेळी मात्र फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना तत्काळ रुग्णालयात येण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना आफरीनचा मृतदेह सोपवण्यात आला.
नर्स कन्निस अन्सारी यांचा मृत्यू
नाइट शिफ्टसाठी जाणाऱ्या ५५ वर्षीय कन्निस अन्सारी या नर्स होत्या. नाइट शिफ्टसाठी त्या नेहमीप्रमाणे दवाखान्यात जात होत्या. मात्र, रुग्णालयात ड्युटीवर जात असतानाच बसचा अपघात घडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना मृतावस्थेतच दवाखान्यात आणण्यात आले.
अपघातामुळे बेस्ट मार्गात बदल
कुर्ला येथील बुद्ध कॉलनी परिसरात सोमवारी रात्री अपघात झाल्याने पोलिसांनी कुर्ला स्थानक बंद केले. परिणामी, या बस स्थानकातून सोडण्यात येणारे बसमार्ग क्रमांक ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ च्या बसगाड्या कुर्ला आगारातून धावत आहेत. तसेच सांताक्रुझ स्थानक - कुर्ला स्थानक दरम्यान धावणारे बस मार्ग क्रमांक ३११, ३१३ आणि ३१८ या बसगाड्या टिळकनगर येथून वळण घेऊन कुर्ला स्थानकाकडे न जाता सांताक्रुझ स्थानकाकडे जात आहेत. बसमार्ग क्रमांक ३१० देखील टिळक नगर पूल येथून वळण घेऊन वांद्रे बस स्थानकाकडे जात आहेत.
सरकारने जखमींनाहीमदत करावी - अमीन पटेल
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी भाभा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची आणि मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी पटेल यांनी मृतांना राज्य सरकारकडून मिळालेली पाच लाखांची मदत तुटपुंजी असून मृतांच्या नातेवाईकांना किमान १० लाखांची मदत करावी, तसेच जखमी झालेल्यांनाही सरकारच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, या घटनेस बेस्ट उपक्रम जबाबदार असून संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर केली आहे.
ब्रेक फेल झाल्याचा दावा चुकीचा
दरम्यान, अपघात झालेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यामध्ये अपघातग्रस्त बसचा ब्रेक फेल झाल्याचा दावा चुकीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ड्रायव्हर-कंडक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
कुर्ला अपघातप्रकरणी बेस्ट अधिकारी आणि कंत्राटदाराच्या चौकशीची शक्यता आहे. ड्रायव्हर संजय मोरेला मिनी बस व इतर गाड्या चालवण्याचा अनुभव होता. मात्र, मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. ड्रायव्हर संजय मोरे याच्यासोबत आता कंडक्टर सिद्धार्थ मोरेवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात ७ लोकांचा मृत्यू झाला. त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. या घटनेत जे जखमी झालेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments