गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर परखड टीका
मुंबई - देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ % इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले असून ४५ हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत. ऍसिड हल्ले, सायबर गुन्हे यात महिलांचे प्रमाण अधिक आहेत. एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मुख्यमंत्री यांचा बुलडोझर फक्त काही भागात चालत असून ते कामापेक्षा शोबाजी करत असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हे सरकार मोठं मोठया घोषणा सर्वसामान्यांसाठी नव्हे कंत्राटदारांच्या हितासाठी करत अशा शब्दांत दानवे यांनी२६० अनव्ये प्रस्तावावर बोलताना सरकारने केलेल्या विविध घोषणांवर सरकारवर निशाणा साधला. सरकार राज्याच्या विकासासाठी काम करत नसून स्वार्थ आणि भ्रष्टाचारासाठी काम करत असल्याचे दिसते. गृह विभाग हे विशिष्ट अधिकारी, कंत्राटदार यांच्यासाठी काम करते का की प्रस्ताव समोर ठेवून काम करते, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. या विभागातील अधिकारी जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात आणि राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम करतात अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.



No comments