मुरबाड मधिल आठवडी बाजार भरतो चिखलात.व्यापाऱ्यांना पन्नास रुपये भरण्याची सक्ती
गौरव शेलार / मुरबाड :- तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागातील नागरिकांना लागणारा किराणा सामान, भाजीपाला खरेदीचे एकमेव ठिकाण असलेल्या मुरबाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत भरत असला तरी तेथे खरेदी विक्री साठी येणारे व्यापारी हे चिखलात बसुन आपला व्यवसाय करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा न पुरविता सक्तीने पन्नास रुपये बाजार समिती कडून वसुल केले जात असल्याने तमाम व्यापारी, ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजार भरत असुन तेथे खरेदी विक्री साठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना किमान पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय अशी कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली.सध्या सर्वत्र संतधार पाऊस कोसळत असताना हा आठवडी बाजारात येणारे व्यापारी हे चिखलात बसुन आपला व्यवसाय करत आहेत.
त्यामध्ये महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.शिवाय या चिखलयुक्त परिसरात असणाऱ्या खड्ड्यामध्ये पाणी साठले असुन खरेदी साठी येणारे ग्राहक हे आपली छोटी मोठी वाहने आणत असल्याने एखादे वेळी वाहन खड्ड्यामध्ये आदळल्याने व्यापारी पुरुष तसेच महिलांचे अंगावर चिखल उडुन वाद निर्माण होतो. हे प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना परिसरात असणाऱ्या खड्ड्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता सक्तीने आमच्या कडून पन्नास रुपये वसुल करतात.ते दिले नाही तर धंदा लावून देत नाहीत अशा संतप्त प्रतिक्रिया कांताबाई दत्तात्रय खुणे, शकुंतला बबन चासकर,व सुरेश वारघडे हे देत आहेत.
बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्याची व ग्राहकांची पावसामुळे गैरसोय होत आहे.त्यासाठी आम्ही त्यांना बसण्यासाठी उंच चौथरे बांधण्याचे कामाला मंजुरी घेतली आहे.लवकरच ते काम सुरू होईल.शिवाय प्रत्येकाकडून जी वसुली केली जाते.ती सफाई करण्यासाठी लागणाऱ्या मजुरीवर खर्च केली जाते
- लक्ष्मण सरनिंगे.सभापती.कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड.




No comments