web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड नगरपंचायतीत ‘थार रॉक्स’ची चर्चा! कोटींच्या बिलांमागे नेमकं गौडबंगाल काय? लवकरच ‘द फ्रेंडशिप फाईल’ समोर येणार

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीच्या कारभाराबाबत आता एका महागड्या गाडीची चर्चा रंगू लागली आहे. कोट्यवधी रुपयांच्या बिलांच्या व्यवहारांशी संबंधित एका ठेकेदाराने नगरपंचायतीतील एका अधिकाऱ्याला नवी कोरी ‘थार रॉक्स’ कार भेट दिल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा YML NEWS कडून करण्यात येत आहे. या चर्चेमुळे मुरबाडच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता असून, या  व्यवहारामागील सत्य काय हे लवकरच समोर येणार आहे.

सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांची बिले, कामांची गुणवत्ता, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि देयकांची मंजुरी या बाबी पारदर्शक असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एखाद्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्याला महागडी गाडी भेट दिल्याचा दावा खरा असेल, तर या व्यवहाराची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित गाडीची मालकी, खरेदीसाठी वापरलेला निधी, व्यवहाराची कागदपत्रे आणि बिलांशी त्याचा काही संबंध आहे का, याची तपासणी होणे आता गरजेचे आहे.

मोदी-अदानी चर्चेच्या धर्तीवर ‘मुरबाडची द फ्रेंडशिप फाईल’?

देशाच्या राजकीय वर्तुळात नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवरून वेळोवेळी चर्चा होत असताना, त्याच धर्तीवर मुरबाडमधील त्या ठेकेदार-अधिकारी संबंधांची माहिती जनतेसमोर आणण्याचा इशारा YML NEWS कडून देण्यात आला आहे. ‘द फ्रेंडशिप फाईल’ या नावाने संबंधित व्यवहारांचे पुरावे आणि कागदपत्रे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

संबंधित गाडीची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे तपशील, बिलांची मंजुरी, कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि ठेकेदार-अधिकारी यांच्यातील संबंध याबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

या प्रकरणात मुरबाड नगरपंचायत प्रशासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची अधिकृत भूमिका समोर येणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

मुरबाडच्या विकासकामांमध्ये सार्वजनिक पैशांचा विनियोग पारदर्शक पद्धतीने झाला आहे का, बिलांमध्ये काही अनियमितता आहे का आणि महागड्या गाडीच्या चर्चेमागे नेमके सत्य काय, या प्रश्नांची उत्तरे कागदपत्रे आणि अधिकृत चौकशीतूनच मिळू शकतील. YML NEWS कडून जाहीर करण्यात आलेली ‘द फ्रेंडशिप फाईल’ प्रत्यक्षात कोणती माहिती उघड करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments