web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड नगरपंचायतीत तक्रारींची ‘कचरापेटी’? नगरपंचायतीच्या कारभारावर संशयाचे सावट!

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित बिल्डर्स तसेच इतर व्यक्तींविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे नेमके काय झाले, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तक्रारदारांनी संबंधित प्रकरणांबाबत नगरपंचायतीकडे लेखी निवेदने व तक्रारी सादर केल्या असतानाही आजतागायत त्यावर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनाच्या दप्तरी न्याय मिळतोय की त्या केवळ कागदावरच धूळ खात पडल्या आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बिल्डर्स आणि इतरांविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची, तसेच आर्थिक व्यवहार किंवा कथित ‘हप्तेबाजी’मुळे तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची चर्चा असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे.

सामान्य नागरिक आपल्या समस्या आणि तक्रारी घेऊन नगरपंचायतीच्या दारात जात असतील, तर त्या तक्रारींची नियमानुसार चौकशी करणे आणि योग्य ती कार्यवाही करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, तक्रारी देऊनही कारवाई होत नसेल, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होणे स्वाभाविक आहे. संबंधित प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली, चौकशी सुरू आहे का, तसेच तक्रारी प्रलंबित असण्यामागील कारण काय, याचा खुलासा नगरपंचायतीने करणे गरजेचे आहे.

मुरबाड नगरपंचायतीच्या कारभाराबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणांची दखल घेतली जात आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई होणार की तक्रारदारांना कार्यालयांचे उंबरठे झिजवतच राहावे लागणार, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

एकीकडे नागरिकांच्या तक्रारी, दुसरीकडे कारवाईबाबतची अनिश्चितता आणि त्यात कथित आर्थिक व्यवहारांचे आरोप या पार्श्वभूमीवर मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे

 

No comments