web-banner-lshep2024

Breaking News

महिलांवर हात उचलणाऱ्या दिल्ली पोलिसांपासून विद्यार्थ्यांना ‘५० ग्रॅम पावडर’च्या धमकीपर्यंत; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

 

गौरव शेलार / मुंबई  : महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली पोलिसांच्या कथित गैरवर्तनावरून संताप व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये एका महिला नागरिकासोबत पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेत दिल्ली पोलिसांचे डीसीपी संदीप लांबा यांनी एका महिलेला हात उचलल्याचा आरोप होत आहे. या कथित प्रकारामुळे दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही काही पोलिसांकडून विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांच्या खिशात किंवा बॅगेत ५० ग्रॅम पावडर टाकली जाईल आणि त्यानंतर तुमचे आयुष्य बरबाद होईल, अशा आशयाचे वक्तव्य केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारची भाषा वापरणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांकडून नागरिकांना संरक्षण आणि सुरक्षिततेची भावना मिळणे अपेक्षित असते. मात्र, पोलिसांकडूनच खोटे गुन्हे दाखल केले जातात, खोट्या केसेसमध्ये अडकवले जाते, असे आरोप नागरिकांकडून सातत्याने केले जात असल्याने या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

एका बाजूला महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात असताना, दुसऱ्या बाजूला नागरिकांशी गैरवर्तन, धमकीची भाषा किंवा अधिकारांचा गैरवापर केल्याचे आरोप होत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागरिकांवर अन्याय होत असल्याचे आरोप खरे असतील तर त्याची चौकशी कोण करणार? पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर होत असेल तर त्यावर कारवाई कधी होणार? असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

No comments