web-banner-lshep2024

Breaking News

'मुंबई-नाशिक रोडवरील नव्या उड्डाणपूलाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करा '- एकनाथ शिंदेंचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ठाणे : वाहतूक कोंडीमुळे त्रस्त मुंबई–नाशिक महामार्गावरील खारेगाव उड्डाणपूल तीन दिवसांत सुरू होणार आहे. रखडलेले कशेळी आणि वडपे पुलाचे काम महिनाभरात पूर्ण होईल. मात्र रेल्वेवरील चौथ्या पुलासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेतला जाणार आहे. नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाच्या 1600 पॅनलचे बांधकाम निकृष्ट आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून जबाबदार एमएसआरडीसी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत 2026–27 या आर्थिक वर्षासाठी 1700 कोटींच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण उपयोजनांसाठी 660 कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी 140 कोटी आणि अनुसूचित उपयोजनांसाठी 107 कोटी रुपयांचा समावेश आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, रखडलेली पूल आणि रस्त्यांची कामे तसेच मंजूर जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यास अपयशी झालेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. यापुढे 100 टक्के निधी खर्च करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या विभाग प्रमुखावर कारवाई करण्याचा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

एमएमआरडीए प्रमुखांसोबत कामाची पाहणी : आमदार रईस शेख यांनी थेट एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्याची कानउघडणी करत अनिल गायकवाड यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी वाहुतक कोंडी, रस्त्यावरील पडलेले खड्डे, मेट्रो, आदी प्रकल्पांबाबत संबंधित अधिकऱ्यांबाबत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे मेट्रोची चाचणी घेऊन वडाळा - कासारवडवलीच्या चार किलो मीटरपर्यंत मेट्रो (चार) डिसेंबरमध्ये सुरु करण्याची घोषणा केली होती. ती ठाणे मेट्रो सुरूच होऊ शकली नाही. याबाबत विचारला झाली असता एकनाथ शिंदे म्हणाले की," ही मेट्रो वडाळा ते कासारवडवली, भाईंदर पाड्यापर्यंत आहे. या मेट्रोच्या कामाची पाहणी मी स्वतः एमएमआरडीएचे प्रमुख मुखर्जी यांच्यासोबत करेन. त्यासाठी जातीनं लक्ष घालणार असल्याचं आहे". मात्र चौथ्या पट्ट्यातील मेट्रो कधी सुरू होईल, याचं उत्तर मिळू शकलं नाही. बारावीच्या परीक्षेला जाताना डोंबविलीच्या विद्यार्थीचा रेल्वेतून पडून झालेला मृत्यू हा दुर्देवी आहे. रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणार : भटक्या कुत्रांच्या हल्ल्यातून अनेक मुले जखमी झाले आहेत. भिवंडीत एका लहान मुलाचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांसाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारण्याच्या सूचना सर्व महापालिका आयुक्तांना दिल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कुत्रे पकडण्यासाठी डॉग व्हॅन खरेदी करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

 
महिला पत्रकारांचा अपमान करणे अयोग्य : " पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचा आदर आणि सन्मान आहे. रागाच्या भरात पत्रकारांचा अपमान करणं योग्य नाही. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आल्याच्या रागापोटी शिवसेना यूबीटीच्या नेत्या विशाखा राऊत यांनी महिला पत्रकारांचा अपमान केला, ही घटना दुर्दैवी आहे", अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाखा राऊत यांच्या कृतीचा समाचार घेतला.

 

No comments