मुरबाड मध्ये सर्दी खोकला तापाच्या आजाराने रूग्णांमध्ये वाढ..!
गौरव शेलार / मुरबाड : पंधरा ते वीस दिवसांत शहरात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. एका रुग्णाचे दर आठवड्याला सरासरी 500 ते 1500 रुपये साधी वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार यावर खर्च होत आहेत.
हवामानात बदल झाला म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आजारी पडत आहेत. पावसाळा असूनही कधी ऊन तर कधी पाऊस, हवेतील दमटपणा यामुळे सर्दी, खोकला व ताप यांचे रुग्ण वाढले आहेत.
यातून पूर्णपणे बरे होण्यास सात ते दहा दिवसांचा कालावधी रुग्णांना लागत आहे, त्यानंतर भरपूर अशक्तपणा जाणवणे ही सार्वत्रिक तक्रार रुग्णांकडून ऐकायला मिळत आहे. आजारपणाची आर्थिक झळ रुग्णांना बसत आहे. आठवडाभराच्या औषधांसाठी 1000 ते 1500 रुपये लागतात, अशी माहिती मेडीकल विक्रेत्यांनी दिली.यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यानंतर सकाळी ढगाळ वातावरण, मध्येच कडक ऊन आणि पाऊस यामुळे सर्दी, खोकला, तापाने आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामिण रूग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे.
दरवर्षी जून महिन्यामध्ये पावसाची वाट पाहवी लागते. काहीवेळेला जून कोरडाच जातो. यंदा मात्र, मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी पाऊस व दुपारी कडक उन्ह या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडते तर मधूनच कधी थंडी जाणवते, तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडायला लागतो. या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत.
No comments