शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार? कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? दिल्लीतून ठरणार मंत्री
मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आपली वर्णी लागण्यासाठी माजी मंत्र्यांसह इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याची यादी दिल्लीत पाठवण्यात आली असून एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळात कोण असेल याचे चित्र स्पष्ट होईल, असे महायुतीकडून सांगण्यात आले.
महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आता १६ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करणे अनिवार्य आहे. मात्र, महायुतीतील भाजप आणि शिंदेंची शिवसेना गृह खात्यावर अडून बसले आहेत. गृहमंत्री कोण याचा निर्णय थेट दिल्ली दरबारी होणार असून दोन दिवसांत दिल्लीतून निर्णय जाहीर होताच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे महायुतीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, वादग्रस्त विधान करणारे, अडीच वर्षांच्या कार्यकाळात महायुतीसाठी अडचणीचे निर्णय घेणारे मंत्री आदींचा नव्या मंत्रिमंडळात समावेश नसेल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा १४ डिसेंबरला होणार असल्याचे समजते.
No comments