web-banner-lshep2024

Breaking News

बलात्काराचे खटले तातडीने निकाली निघावेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचे निकाल लागण्यात विलंब होत असल्याने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होतो. न्यायपालिका संवेदनशील नसल्याची सर्वसामान्यांची भावना होते. त्यामुळे बलात्कारासारखे गंभीर गुन्ह्यांचे खटले तातडीने निकाली निघायला हवेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी केले.

दोन दिवसांच्या राष्ट्रीय जिल्हा न्यायपरिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हेही उपस्थित होते.

त्या म्हणाल्या की, न्यायालयातील न्याय देण्याच्या प्रक्रियेतील विलंब टाळणे गरजेचे आहे. न्यायालयातील प्रलंबित खटले हे मोठे आव्हान आहे. ही प्रलंबित खटल्यांची संस्कृती बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील न्यायालयाचे निकाल अनेक वर्षानंतर येतात. त्यामुळे न्यायालयात न्याय मिळत नाही, अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

किती वेळ वाट पाहायची?

गावातील लोक न्यायपालिकेला देवच मानतात. कारण त्यांना तेथे न्याय मिळतो. ‘भगवान के घर देर है, अंधेर नही’, अशी म्हण आहे. पण, किती वेळ वाट पाहायची, असा सवाल त्यांनी केला. कारण जेव्हा पीडित व्यक्तीला न्याय मिळतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झालेले असते. तर काही बाबतीत याचिकादाराचा मृत्यूही होतो. त्यामुळे न्यायालयीन खटले लवकरात लवकर निकाली निघावेत, यासाठी गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

No comments