मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? भाजपा गटनेते दरेकरांचा जरांगेंना सवाल
मुंबई / प्रतिनिधी - मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील
यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी
प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.
तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो.
मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते
आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. ते पत्रकार
परिषदेत बोलत होते.
दरेकर म्हणाले की, जरांगे यांनी सबुरीने
घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत हिच तुमची ताकद, सामर्थ्य आहे.
हे मराठा समाजाला माहित आहे. म्हणून समाज आपल्या पाठीशी उभा आहे. पण
तुम्हाला कुणी काही बोललं तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरीतुमरी बंद
केले पाहिजे. स्वतःची वक्तव्य मुजोरपणा सारखी वाटतात आणि दुसऱ्याला
मुजोरडा, माजोरडा बोलायचे. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ
नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांचे नेतृत्व करा. सरकार मराठा
समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवले. मराठा समाजासाठी
ज्यांनी पहिले बलिदान दिले ते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र
पाटील यांनी पुस्तिका तयार केली आणि एक लाख बेरोजगार मराठा तरुणांना
उद्योजक बनवले तेही जाहीर केले. मराठा समाजाच्या प्रश्नी सरकार सकारात्मक
आहे, चर्चा करत आहे. परंतु आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची दखल
घेण्याऐवजी शिवराळ भाषा वापरली जाते. आम्हीही २० वर्षे राजकारणात आहोत.
आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. गरीब कुटुंबातून येऊन आम्ही प्रगती
केलीय. सगळेच शिव्या सहन करणारे नसतात. संयमाने बोला. मागण्या ताकदीने
मांडा आम्ही सोबत आहोत. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील
यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली. अनेक नेत्यांनी बलिदान दिले.
अनेक नेत्यांनी काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न
केलाय. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय
होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवालही
दरेकरांनी केला.
संजय राऊत यांचा कायद्याचा अभ्यास जास्त
दरेकर
म्हणाले की, संजय राऊत यांचा कायद्याचा अभ्यास जास्त झाला आहे. त्यांना
अटक झालीय, जेलमध्ये जाऊन आलेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास नीट झालेला आहे.
राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही अजिबात किंमत द्यायचे नाही असे ठरविले आहे.
त्यांचे कुठलेही वक्तव्य संदर्भहीन असते. तुमच्या घरातल्या माणसांना
तुम्हाला टिकवता आले नाही हा तुमचा कमकुवतपणा आहे. स्वतःचा कमकुवतपणा
लपविण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे हा संजय राऊत यांचा नित्यक्रम झाला
असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.



No comments