web-banner-lshep2024

Breaking News

फडणवीस संयमी! त्यांना दुर्बल समजू नये भाजपा गटनेते दरेकर यांचा जरांगेंना इशारा

मुंबई :  मराठा समाजाने जो विश्वास जरांगे पाटलांवर दाखवलाय त्यातून अहंकार येता कामा नये. ते आपल्या व समाजाच्या हिताचे नाही. कारण अहंकारातून ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणे पुढे आलीत. जरांगे यांचा द्वेष फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीसांची संयमी भुमिका म्हणजे त्यांची दुर्बलता समजू नये, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले की, जरांगेंनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू केले त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस हेच राहिलेले आहेत. जसे काय देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाला आडवे आहेत, अशा प्रकारचे चित्र, कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे तो राबविताहेत की काय अशी भावना झालीय. देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजासाठी योगदान नाही का? मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम फडणवीसांनी केले. ते हायकोर्टात टिकवले, सुप्रीम कोर्टात नाकारले गेले नाही. परंतु नंतर उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर त्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षण गेले. परंतु त्यांना जाब विचारला गेला नाही आणि तेच आता आम्ही फडणवीसांची बाजू घ्यायला गेलो तर आम्हाला फडणवीसांचा रोग झाल्याचे सांगतात. मग तुम्हाला फडणवीस द्वे्षाचा रोग झालाय का? असा सवालही दरेकरांनी जरांगे यांना केला.


No comments