शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मनोमीलन;दीपक केसरकर यांचं वक्तव्य चर्चेत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते हे आजही शरद पवार यांना भेटले. सलग दोन दिवस या सगळ्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे नवं समीकरण घडणार का? याची चर्चा आता सुरु झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनीही आम्ही शरद पवार यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहोत असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार अजित पवार मनोमीलनाविषयी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे?
“अजित पवार आणि शरद पवार यांचं मनोमीलन व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करु. मी सुद्धा सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासूनच केली आहे. काँग्रेसमध्ये सुरुवात केली आणि मग शरद पवारांसह राष्ट्रवादीत गेलो. मला वाटतं जर शरद पवार यांच्याकडे सगळ्यांनी आग्रह धरला तर निश्चितपणे त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ते कदाचित तयार होऊ शकतील. मात्र इतक्या मोठ्या माणसाच्या मनात काय? हे सांगता येत नाही” असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला झाला पाहिजे इतकीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करु शकत नाही. ते स्वतः सत्तेवरही होते. त्यांना हे ठाऊक आहे की सत्तेवर असताना जी कामं होतात ती विरोधात असताना होत नाहीत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा एवढी आमची अपेक्षा आहे. असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.



No comments