गुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे
बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुभारंभ केला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली
उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी
आनंद व्यक्त केला.गुन्हेगारांची माहिती तात्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण
वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा
शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी अॅम्बिस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास
मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
यावेळी पोलीस आयुक्तालयातील जे.एस. भरुचा सभागृहाचे उद्घाटन, कचरामुक्त मोहिमेचा शुभारंभ
आणि मुंबई पोलिसांच्या रक्षक हैं हम या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
झाला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार,
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण
मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक
ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सायबरने पुढाकार
घेऊन सुरु केलेल्या ॲम्बिस प्रणालीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रणालीचे लोकार्पण
करताना मुख्यमंत्री म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने
कायदा व सुव्यवस्था उत्तमपणे राखण्यासाठी मदत होत आहे. या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या
बोटांचे ठसे, हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठविण्यासाठी ॲम्बिस (ऑटोमेटेड
मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली गुन्ह्यांच्या तपासाची गती
वाढवणारी ठरेल. त्या माध्यमातुन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केला.पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्याची
कालबाह्य पद्धत बदलून आता केवळ बोटांचे ठसेच नाही तर हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे
स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात येणार असल्याने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी
उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ॲम्बिस प्रणाली पोलिसांचे गुगल म्हणून नावारुपास येईल,
असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सीसीटीव्ही, सीसीटीएनएस
आणि ॲम्बिस प्रणालीचा वापर सुरु केल्यानंतर गुन्हेगारास तात्काळ अटक होतानाच गुन्हे
व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत बसविलेल्या सीसीटीव्हीतच शहरातील प्रत्येक
भागावर नजर ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती,
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, सणासुदीच्या काळात वाहतुकीत करावयाचे बदल
हे या माध्यमातून शक्य झाले आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.मुंबई
पोलीस आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त मोहिमेतून कचरामुक्त मुंबई अभियान सुरु
करण्यात आले आहे. सगळ्यांना एकत्रित करुन लोक, समाज आणि प्रशासन एकत्र आले तर त्यातून
निर्माण होणाऱ्या उर्जेतून सकारात्मक कार्य घडते हे स्वच्छ भारत अभियानातून दिसून आले
आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कचरामुक्त मुंबईद्वारे लोकांच्या सवयी बदलताना
प्रबोधनाबरोबरच शासनही आवश्यक असल्याचे सांगत यामुळे केवळ बाह्य मुंबई नव्हे तर अंतर्गत
मुंबईतला भाग स्वच्छ करावा, नाले, गटारी स्वच्छ ठेवून निर्मळ वातावरण राखण्यास मदत
होईल, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.मुंबई
पोलिसांनी सुरु केलेल्या ‘रक्षक हैं हम’ या विशेष अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये
विश्वास निर्माण करतानाच पोलीस मित्र वाटले पाहिजे असे वातावरण तयार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रक्षक हैं हम’ अभियानाच्या माहितीपट आणि जाणीव
जागृतीपर पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त श्री. परदेशी,
मुंबई पोलीस आयुक्त श्री.बर्वे यांची भाषणे झाली. कचरामुक्त मुंबई मोहिमेच्या माध्यमातून
पोलीस आणि महापालिका यंत्रणा एकत्रित आल्याने शहर स्वच्छ होतानाच गुन्हेगारी कमी होऊन
नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे यावेळी त्यांनी सांगितले.



No comments