जूनमध्ये राज्यातील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर 62 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका
BY
- युवा महाराष्ट्र लाइव - मुंबर्इ
गत अडीच महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांचा
धुरळा 23 मे रोजीच्या निकालानंतर शांत होणार आहे. असे असले तरी राज्यातील ग्रामपंचायतींच्या
निवडणुका जूनमध्ये होऊ घातल्या आहेत. राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील
6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान
होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया
म्हणाले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या
या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे
31 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या
दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून
2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 10 जून 2019 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी
निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत
होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ
3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.



No comments