web-banner-lshep2024

Breaking News

चांगल्या दर्जाच्या सुविधांसाठी आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BY - युवा महाराष्ट्र लार्इव्ह - वर्धा
जगातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा असलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या  आरोग्य  सुविधा मिळतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी,खासदार रामदास तडस, आमदार अरुण अडसड, डॉ.पंकज भोयर, समीर कुणावर,सागर मेघे, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू दत्ता मेघे, शालिनीताई मेघे,वेदप्रकाश मिश्रा, वोक्‍हार्ट हॉस्पिटलच्या संचालक डॉ. झाबियाजी कोराकिवाला आदी उपस्थित होते.
     मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे 50 कोटी नागरिकांना आरोग्य सुविधेचे कवच मिळाले आहे. या योजनेमुळे प्रत्येक पात्र व्यक्ती पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा प्राप्त करून घेण्यास पात्र ठरला आहे. योजनेमुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये देय क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या खासगी संस्थांना ग्रामीण भागात गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आहे. त्यांनी गुंतवणूक केल्यास नागरीकांना दर्जेदार सेवा मिळू शकतील.
      राज्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून मेघे रुग्णालयाने राज्यात सर्वाधिक उपचार केले आहे. स्टेट ऑफ आर्ट असलेल्या या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सुविधांमध्ये गुणात्मक वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी,त्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या तीन योजनांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरास मदत करण्यात येईल.
 श्री. गडकरी म्हणाले, देशात आठ लाख डॉक्टरांची गरज आहे. डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार नसल्याने या भागात चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खासगी संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सुविधा सुधाराची गरज आहे. चांगल्या डॉक्टरांनी या भागात सेवा द्यावी. आता कार्पोरेट क्षेत्रही रुग्णालये सुरु करू शकत असल्याने त्यांनी सेवेसाठी ग्रामीण क्षेत्र निवडावे. आरोग्य सेवेत दर्जेदार सुविधेसोबत स्पर्धाही निर्माण होणे गरजेचे आहे. याचा लाभ रुग्णांना मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भावनेतून कार्य व्हावे. विदर्भात आरोग्य सेवा देण्यात मेघे यांच्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालायचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, दत्ता मेघे, वेदप्रकाश मिश्रा,वोकहार्ट रुग्णालयाच्या संचालक झाबीयाजी कोराकिवाला यांनी मनोगत व्यक्त केले. दत्ता मेघे यांच्या हस्ते मेघे ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी45 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. समीर मेघे यांनी प्रास्ताविक केले. सागर मेघे यांनी आभार मानले.कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. रूग्णालयातील आयसीयू, खासगी रुम, शस्त्रक्रिया कक्ष आदींची पाहणी केली. मुख्यमंत्र्यानी रूग्णांची भेट घेऊन संवादही साधला.

No comments