"मुरबाडमध्ये अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर" ; जादा दर आकारणी, कुल्फीमध्ये माशी आढळल्याचा प्रकार...
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील पाटोळे नामक थंडपेय व कुल्फी विक्रेत्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ग्राहकांची आर्थिक फसवणूक आणि अन्नसुरक्षेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. जादा दराने थंडपेय विक्री करणे, ग्राहकांनी जाब विचारल्यास उडवा-उडवीची उत्तरे देणे आणि गुणवत्तेबाबत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या कुल्फीमध्ये चक्क माशी आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता.या घटनेनंतर संबंधित ग्राहकांनी दुकानदाराकडे तक्रार केली असता जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ती उत्पादकांवर ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते.मात्र ग्राहकांच्या मते,विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाची जबाबदारी विक्रेत्याचीही तितकीच असते.
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार,ज्या कुल्फीमध्ये माशी आढळली ती केवळ एकच घटना आहे की यापूर्वीही अशा दूषित पदार्थांची विक्री झाली आहे,याचा शोध घेणे आवश्यक आहे.अशा परिस्थितीत किती ग्राहकांनी हे पदार्थ सेवन केले असतील आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला असेल का,हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.याशिवाय काही ग्राहकांनी थंडपेय व इतर खाद्यपदार्थांवर मुद्रित किमतीपेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याची तक्रार केली आहे. ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षेचा प्रश्न की प्रशासनाचे दुर्लक्ष?
मुरबाड शहरात खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियमित तपासणी होत आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित दुकानाची तपासणी करावी,नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे,ठाणे जिल्हाधिकारी तसेच मुरबाड तहसील प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी नागरिकांनी 'जनदिशा'च्या माध्यमातून केली आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी आणि हक्कांशी संबंधित अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष होणे धोकादायक ठरू शकते.त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी जनभावना व्यक्त होत आहे.



No comments